भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांचा सवाल
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना सवाल केल्यानंतर त्यांच्या पक्षाने उत्तर देण्याऐवजी शिवसेनेचे मुखपत्र सामनाने अग्रलेख लिहिला आहे आणि पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मात्र दोन वाक्यात बोळवण केली आहे. सामनाला उद्धव ठाकरे यांच्याऐवजी शरद पवार यांचा कळवळा का आला आहे, असा सवाल अवधूत वाघ यांनी गुरुवारी केला.
मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवार यांच्या कोकण दौऱ्याबद्दल टीका टिप्पणी करताना शरद पवार यांना आता जाग आली का, असा सवाल केला होता. विरोधी पक्षाच्या राज्याच्या प्रमुखाने सत्ताधारी आघाडीतील एका पक्षाच्या प्रमुखाला सवाल केला तर त्या पक्षाच्या नेते – प्रवक्त्यांनी उत्तर देणे अपेक्षित आहे. पण तसे न होता शिवसेनेच्या मुखपत्राने हा विषय ओढवून घेऊन खुलाशासाठी पूर्ण अग्रलेख खर्ची घातला. त्या अग्रलेखात शिवसेना पक्षप्रमुखांचा उल्लेख मात्र ‘मुख्यमंत्री ठाकरे यांनीही रायगडचा छोटेखानी दौरा केला. ते पुन्हा एकदा तेथे जातील असे दिसते,’ एवढाच किरकोळ केला, हे आश्चर्यकारक आहे, असे अवधूत वाघ यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सामना शिवसेनेचे मुखपत्र आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुखपत्र आहे, असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शरद पवार यांच्याविषयीची वक्तव्ये जगजाहीर असताना पवारांचे गुणगान करण्यासाठी सामनाचा अग्रलेख खर्ची पडावा आणि त्याच अग्रलेखात बाळासाहेबांच्या चिरंजीवांच्या दौऱ्याला छोटेखानी म्हणावे, हे चमत्कारिक आहे. पवार त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात आपला पक्ष मजबूत करू पाहत आहेत आणि सामनामध्येच त्यांच्या समर्थनार्थ अग्रलेख प्रसिद्ध होतो. शरद पवारांच्या कोकण दौऱ्याची वातावरण निर्मिती करताना जणू काही राज्याच्या प्रमुखाच्याच दौऱ्यासारखे चित्र निर्माण केले जाते. शिवसेनेच्या मुखपत्राने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचा बचाव करावा आणि आपल्या पक्षप्रमुखांची उपेक्षा करावी, हे सर्व आश्चर्यकारक आहे. या विचित्र प्रकाराबद्दल सामनाच्या संपादकांनी खुलासा केला तर राजकीय गोंधळ टाळला जाईल.