कामठी फार्मसी महाविद्यालयास राष्ट्रीय लिलावती अवार्ड-२०२०

कामठी ता.प्र.दी.१२:-शिक्षण मंत्रालय भारत सरकार तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने २०२० वर्षाचा राष्ट्रीय लिलावती अवार्ड श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी, कामठी या महाविद्यालयास प्रदान करण्यात आला. या माध्यमातून संस्थेच्या व महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली असून राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे योगदान पोचले आहे.

महिला सशक्तीकरण संदर्भात संपूर्ण भारतातून ५०० महाविद्यालयांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेकडे प्रकल्प सादर केलेला होता. ज्यात श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी, कामठी या महाविद्यालयाच्या चमूने सॅनीटेशन आणि हायजेनिक या प्रकल्पांतर्गत अद्वितीय सादरीकरण करुन महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात भारतातून एकमेव विजेता पद संपादीत केले.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली येथील सभागृहात रविवार (ता.११) रोजी दुपारी चार वाजता हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार समारंभात श्री सदाशिवराव शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी, कामठी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ मिलींद उमेकर यांचेसह महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डाॅ. रेनूका दास, प्राध्यापक मनिष आगलावे तसेच विद्यार्थी कु. प्रांजल तिडके व कु. तनिश्का रनदिवे या प्रकल्प चमूने सहभाग घेतला. यावेळी भारत सरकारचे शिक्षामंत्री डाॅ. रमेश पोखरीयाल निशंक व केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री स्मृती इराणी तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष डाॅ अनिल सहस्त्रबुधे यांच्या हस्ते विजेता चमूला रोख पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोव्हिड-19 सारख्या लाॅकडाऊनच्या काळात कामठी फार्मसी महाविद्यालयाच्या चमूने महिला सबलीकरणाकरीता केलेले अद्वितीय प्रकल्प हे खरंच सर्वत्र प्रशंसनीय असल्याचे यावेळी प्राचार्य डाॅ मिलींद उमेकर यांनी सांगितले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती किशोरीताई भोयर, सचिव सुरेशभाऊ भोयर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ मिलींद उमेकर यांच्यासह त्यांच्या चमूचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *