मौदा २९ ऑगस्ट: मध्यप्रदेशात झालेल्या अतिवृष्टी झाल्यामुळे व चौराई धरणातून सात हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे पेंच व तोतलाडोह धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे कन्हान नदी ला महापूर आलेला आहे. या महापुरामुळे तालुक्यातील मौदा, चेहडी, झुल्लर, किरणापूर,वढणा, सिंगोरी,मोहखेडी, माथनी या गावांना पुराचा तडाखा बसला असून येथिल शेकडो घरे पाण्याखाली गेले आहेत. चेहडी, वढणा व मौद्यातील काही नागरिकांना तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या नेतृत्वात एन डी आर एफ च्या चमूने सुरक्षित स्थळी हलविले. तालुक्यातील तारसा, निमखेडासह कामठी तालुक्यातील भामेवाडा, जखेगाव, चिकना गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यामुळे क्षतीग्रस्त झालेल्या घरांचे व पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.