शेतातील विहिरीत तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू,ग्रामीण भागात धक्कादायक घटना

रामटेक:-सगळीकडे तान्ह्या पोळ्याचा आनंदोत्सव साजरा करीत असताना शेतातील विहिरीत तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आज नागपूर जिल्यातील रामटेक तहसील अंतर्गत आरोली पोलीस स्टेशन हद्दीत बुधवार रोजी घडली.
विहिरीत उंदीर दिसल्याने त्याला काढण्यासाठी विहिरीत उतरल्याने प्रथम एकाचा आणि त्यानंतर त्याला वाचविण्यासाठी उतरल्याने दोघांचा, अशाप्रकारे विहिरीत उंदराला वाचविण्याच्या बेतात तिघांचा बळी गेला.आकाश भोजराज पंचबुद्धे (वय २७), विनोद प्रभू बर्वे (वय ३७) आणि गणेश मुन्नीलाल काळबांडे (वय२८,तिघेही राहणार वाकेश्वर) अशी त्या मृतांची नावे आहेत. नेहमीप्रमाणे तिघेही मजूर बद्रीनारायण नेहरू सपाटे यांच्या शेतात धानाला रासायनिक खत देण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास शेतातील विहिरीत उंदीर दिसल्याने एक मजूर उंदराला काढण्याकरिता विहिरीत उतरला. मात्र तो बाहेर निघत नसल्याने त्याला काढण्याकरिता दुसरा आणि तिसरा मजूर विहिरीत उतरला. मात्र विहिरीत गॅस असल्याने तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला, घटनेची माहिती अरोली पोलिसांना मिळताच ठाणेदार विवेक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तिघांचेही मृतदेह विहिरीतून मोठ्या शिताफीने काढून घेतले. तिघेही मृत कुटुंबातील कर्ते असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. विहिरीत गॅस तयार झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रामटेक येथे पाठविण्यात आले. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल. पुढील तपास ठाणेदार विवेक सोनवणे करीत आहेत.तर या घटने मुळे आज वाकेशवर गावात आज चुली पेटल्या नाही तर संपूर्ण गावात शोकाकुल पसरलेला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *