नागपूर मध्ये आता गुंडांना थारा नाही गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

नागपूर, जि.प्र.दी.१३
मागील काळात नागपूर शहर हे राज्यातच नाही तर देशात क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जात होते. नागपूर वर लागलेला हा ठसा मिटविण्याचा प्रयत्न गृहमंत्री म्हणून मी करीत आहे. नागपुरातील नामवंत गुंडांनवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात पाठविण्यात येत आहे.पुढील काळात सुद्धा हे काम सुरू राहणार असून नागपूर शहरात आता गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा थारा राहणार नाही असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
नागपूर शहर पोलीस दल पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम करीत आहे. नागपूर शहरातील ११८ गुन्हेगारांवर मोका अंतर्गत तर ५१ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. शहरातील नामवंत गुंड संतोष आंबेकर याच्यावर कारवाई केली. इतकेच नाही तर त्याने अवैधरित्या बांधलेला बंगला जमीनदोस्त करण्याचे कामसुद्धा शहर पोलिसांनी केले. याच प्रकारे सध्या चर्चेत असलेल्या साहिल सय्यद याचे मानकापूर येथील आलिशान घर हे अवैध असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ त्यावर कारवाई करून तेसुद्धा पाडण्याचे काम केले आहे. याचबरोबर यापूर्वी रोशन शेख, प्रीती दास, मंगेश कडव, तपण जयस्वाल व नार्कोटिक गॅंगस्टर आबू अण्णा यासारख्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे काम नागपूर पोलीस करीत आहेत. मी स्वतः नागपूर शहराच्या गुन्हेगारी संबंधीचा अनेक वेळा आढावा घेतला होता. यात नागपूर शहरात कोणी नामवंत गुंड शिल्लक आहे का याची विचारणा पोलीस अधिकाऱ्यांना केली. परंतु आता शहरात कोणताही नामवंत गुंड शिल्लक नाही अशी माहिती मला देण्यात आली आहे. मी नागरिकांना आव्हान करतो की जर त्यांच्याकडे अशा काही नामवंत गुंडांची माहिती असेल व त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे असेल तर त्यांनी मला द्यावे असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
रविभवन येथे कुटीर क्रमांक ११ मध्ये माझे शिबिर कार्यालयात असून या शिबिर कार्यालयात २० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत दुपारी तीन ते चार या वेळात माझे विशेष कार्य अधिकारी डॉ संजय धोटे यांच्याकडे सर्व तक्रारी पुराव्यासहित द्याव्या. गुंडांची माहिती व पुरावे जे नागरिक मला देतील त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल अशी माहिती सुद्धा अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *