पुढील आठवड्यात तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन-निर्बंधांची कडक अंमलबजावणी करुन संक्रमण रोखा-पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला जि.प्र.दी.११: – जिल्ह्यातील कोविड-१९ बाधितांवर एकीकडे वैद्यकीय उपचार होत असतांनाच दुसरीकडे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांची येत्या कालावधीत कडक अंमलबजावणी करावी. तसेच पुढील आठवड्यात दि.१८, १९ व २० हे तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन पाळावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.
कोविड १९ संदर्भात जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्याच्या कोविड संसर्गासंदर्भातील माहितीचे सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात आता अकोला महानगरातील संसर्गाच्या फैलाव बऱ्याच अंशी कमी होत असला तरी ग्रामिण भागात मात्र फैलाव होत असल्याबाबत पालकमंत्री ना.कडू यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी लोकांची ग्रामिण भागातून व शहरातून होत असलेल्या ये जा करण्यावर जे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करा. विनाकारण लोकांची ये जा होता कामा नये,असे निर्देश ना.कडू यांनी दिले. रॅपिड टेस्ट किटचा वापर करुन ग्रामिण भागात सहा हजार लोकांच्या चाचण्यांचे नियोजन करण्याचे नियोजन तयार करण्यात आले असल्याची माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले यांनी दिली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड उपचारासाठी आवश्यक असणारी आणखी ३५ व्हेंटीलेटर्स दाखल झाली असून आता ७१ व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत, अशी माहितीही यावेळी डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी दिली.
ग्रामिण तसेच शहरी भागात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होतांना दिसत नाही. तसेच विनाकारण व मास्क विना अनेक लोक हिंडतांना दिसतात. ह्याच गोष्टी संसर्ग फैलावण्यास कारणीभूत ठरत आहेत. तेव्हा यासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे कडक पालन करण्यात यावे. जिल्ह्याची नाकाबंदी अधिक कडक झाली पाहिजे. विना परवानगी व अत्यावश्यक सेवे शिवाय लोकांची अनावश्यक ये जा होता कामा नये. खेड्या गावातही बाहेरुन आलेल्या प्रत्येक व्यक्तिची नोंद घेतली जाऊन त्याची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे. त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामिण व शहरी भागात नाकाबंदी व जमावबंदीच्या निर्बंधांचे काटेकोरपणे अंलबजावणी करा, असे निर्देश ना. कडू यांनी प्रशासनाला दिले. तसेच पुढच्या आठवड्यात दि.१८,१९ व २० हे तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन पाळा,असेही निर्देश त्यांनी दिले. ज्या ठिकाणी लोकांना क्वारंटाईन केले आहे अशा ठिकाणी पोलिसांची अधिक गस्त वाढवा.
कोविड सोबतच आता पावसाळ्यात साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या साचलेल्या पाण्याच्या डबक्यांवर फवारणी करुन डासांचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजना करण्याबाबतही ना. कडू यांनी निर्देश दिले. रुग्णालये व अन्य ठिकाणी जिथे कोविड संदर्भात उपचार, देखभाल होत आहे अशा ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्याविरुद्ध कारवाई करा, असेही निर्देश ना. कडू यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *